हिटमॅन रोहित शर्माला खेलरत्न जाहीर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, 27 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले. साक्षी आणि मीराबाईचा अर्जुन पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला होता. पण त्या दोघींना खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आधीच मिळाला आहे. त्यामुळे त्यांची नावे वगळून अर्जुन पुरस्कारांच्या यादीला केंद्र शासनाने मंजुरी दिली.

खेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (2000) व सरदारसिंग (2017) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2019 ला कालावधीत राणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना 2017 ला महिला आशिया चषक जिंकून दिला. 2018 च्या आशिया चषकात संघाने रौप्यपदक जिंकले तसेच 2019 च्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती. विनेशने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व 2019 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते.

टेबल टेनिसपटू मनिका बत्राने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह 27 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. राहुल आवारे (कुस्ती), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनांही अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.

भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
रोहित शर्मा – क्रिकेट, मरियप्पन थंगवेलू – पॅरा अ‍ॅथलीट, मनिका बत्रा – टेबल टेनिस, विनेश फोगाट – कुस्ती, रानी रामपाल – हॉकी.

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी – तिरंदाजी, पुरुषोत्तम राय – अ‍ॅथलेटिक्स, शिव सिंग – बॉक्सिंग, रोमेश पठानिया – हॉकी, क्रिशन कुमार हुडा – कबड्डी, विजय मुनीश्‍वर – पॅरा पॉवरलिफ्टिंग, ओम प्रकाश दहिया – कुस्ती.

द्रोणाचार्य पुरस्कार
ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन – हॉकी, योगेश मालवीय – मल्लखांब, जसपाल राणा – नेमबाज, कुलदीप कुमार हांडू – वुशू, गौरव खन्ना – पॅरा बॅडमिंटन.

अर्जुन पुरस्कार
ईशांत शर्मा – क्रिकेट, दीप्ती शर्मा – क्रिकेट, अतनू दास – तिरंदाजी,
द्युती चंद – अ‍ॅथलेटिक्स, सात्विक रानकीरेड्डी – बॅडमिंटन, चिराग शेट्टी – बॅडमिंटन, विशेष भृगुवंशी – बास्केटबॉल, लवलीना बोर्गोहेन – बॉक्सिंग, सुभेदार मनीष कौशिक – बॉक्सिंग,अजय सावंत – घोडेस्वारी, संदेश जिंगन – फुटबॉल, अदिती अशोक – गोल्फ, आकाशदीप सिंग – हॉकी, दीपिका – हॉकी, दीपक हुडा – कबड्डी, सारिका काळे – खो -खो, दत्तू भोकनळ – रोईंग, मनू भाकर – नेमबाजी, सौरभ चौधरी – नेमबाजी, मधुरिका पाटकर – टेबल टेनिस, दिविज शरण – टेनिस, शिवा केशवन – हिवाळी खेळ, दिव्या काकरान – कुस्ती, राहुल आवारे – कुस्ती, सुयश जाधव – पॅरा स्विमिंग, संदीप – पॅरा अ‍ॅथलीट, मनीष नरवाल – पॅरा नेमबाज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *