उन्नावची बलात्कार पीडिता व्हेंटिलेटरवर

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्युशी संघर्ष सुरू असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गुरुवारी या पीडित तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर झाली होती. धक्कादायक म्हणजे जामिनावर सुटलेल्या पाच नराधम आरोपींनीच पीडितेला जाळले होते.

पीडितेच्या जखमा अत्यंत गंभीर असून तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तिची प्रकृती अत्यवस्थ असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. उन्नाव गावातील या पीडित तरुणीच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेली येथे रेल्वेने जाण्यासाठी पीडित तरुणी घराबाहेर पडली. घरापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या पाच आरोपींनी तिला अडवले आणि अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. जीव वाचविण्यासाठी पीडित तरुणी सैरभैर पळत होती. गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलीस आले आणि पीडितेला रायबरेलीतील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी पाच नराधम आरोपी हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश वाजपेयी, शिवम् त्रिवेदी आणि शुभम् त्रिवेदी यांना अटक केली आहे. पीडितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हे नराधम आधी अटकेत होते. नोव्हेंबरमध्ये त्यांना जामीन मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *