21 ऑक्टोबरला मतदान; 24 ला मतमोजणी

 मुंबई

चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर तिसऱया दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर होतील. त्यामुळे अवघ्या महिनाभरात आणि दिवाळीपूर्वी राज्यात कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार कोणत्या पक्षाला दिवाळी साजरी करण्याची संधी देणार? आणि कोणाला राजकीय दिवाळखोरीत काढणार? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणली. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आयोगाने सातारा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पोटनिवडणूक लांबल्याने उदयनराजे भोसले आणि भाजपला धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार, विधानसभा निवडणुकीसाठी 27 सप्टेंबरला अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 ऑक्टोबर अशी आहे. दुसऱया दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. राज्यातील 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

अर्जातील रकाना रिक्त राहिल्यास अर्ज बाद

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उमेदवारी अर्ज तसेच प्रतिज्ञापत्रातील सर्व रकाने भरावे लागतील. उमेदवाराने अर्जातील एकही रकाना रिक्त ठेवल्यास उमेदवारी अर्ज बाद केला जाईल. अर्जात प्रत्येक उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

विधानसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम

27 सप्टेंबर (शुक्रवार) : अधिसूचना जारी होणार

4 ऑक्टोबर (शुक्रवार) : अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

5 ऑक्टोबर (शनिवार) : उमेदवारी अर्जांची छाननी

7 ऑक्टोबर (सोमवार) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत

21 ऑक्टोबर (सोमवार) : मतदान

24 ऑक्टोबर (गुरुवार) : मतमोजणी आणि निकाल जाहीर

27 ऑक्टोबर (रविवार) : निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *